महिला हक्क, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध व बालकांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पैठण (प्रतिनिधी): तालुका विधी सेवा समिती, तालुका व जिल्हा वकील संघ पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ पैठण आर. डी. गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली निंबाळक इंग्लिश स्कूल, पैठण येथे शनिवारी कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात झाले.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच जबाबदार व सजग नागरिक घडविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. यावेळी महिला हक्क, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध आणि बालकांच्या संरक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पैठण तथा प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती एल. एच. जाधव उपस्थित होत्या. तसेच द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. के. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका व जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. प्रीतम एस. साबू व अॅड. इम्रान शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व दीपप्रज्वलनाने झाली. सहशिक्षिका ज्योती गीते यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान केवळ पुस्तकी स्वरूपात न ठेवता त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. प्रीतम एस. साबू यांनी महिला सक्षमीकरण आणि महिलांसह मुलींना सन्मानाने जगण्याचा, शिक्षणाचा, आरोग्याचा व सुरक्षिततेचा अधिकार असल्याचे सांगितले. अमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीच्या आरोग्याचे नुकसान करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या भविष्यावरही त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, आरोग्य आणि सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
अॅड. इम्रान शेख यांनी बालकांच्या शिक्षणाचा, सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि समानतेचा अधिकार स्पष्ट केला. बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा तसेच २०१२ च्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. यावेळी न्यायाधीश एस. के. देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात न्यायमूर्ती एल. एच. जाधव यांनी बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होतो, असे सांगितले. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी बालविवाह न करण्याची आणि बालविवाहमुक्त भारत घडविण्याची शपथ घेतली. विद्याथ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक व न्यायव्यवस्थेशी संबंधित जबाबदारीची जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध जागरूक राहावे, असा संदेशही देण्यात आला. सूत्रसंचालन तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी एस. एम. वाघचौरे व सहशिक्षिका. कुजा वानखेडे यांनी केले. निंबाळक इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वी झाला.















